trending_up TRENDING:

Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

नागपूर असो किंवा मुंबई, युवकांना प्रगतीसाठी योग्य संधी आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत. युवकांच्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

person
Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतरवरील जेनझी आंदोलनावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जेनझीच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. आंदोलनाची सुरुवात योग्य दिशेने होती, मात्र नंतर काही अँटी-सोशल एलिमेंट्स सहभागी झाल्याने आंदोलनाची दिशा बदलली आणि ते डायरेक्शनलेस झाले, अशी टीका त्यांनी केली. मात्र, केवळ त्यावरून संपूर्ण जेनझीवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अमृता फडणवीस म्हणाल्या की, जंतर-मंतरवरील आंदोलनाची सुरुवात पेपर लीकच्या प्रश्नापासून झाली आणि सुरुवातीला हा मुद्दा योग्य दिशेने जात होता. मात्र, त्यानंतर आंदोलनात काही वेगवेगळे अँटी-सोशल एलिमेंट्स सहभागी झाले. त्यामुळे वातावरण बदलले आणि आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला पडत ते दिशाहीन झाले. जर आंदोलनाने सुरुवातीचा मुद्दा कायम ठेवला असता, तर ते अधिक रिलिव्हंट राहिले असते, सरकारने परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत यापूर्वीच काही पावले उचलली आहेत आणि त्यावर काम सुरू असल्याचेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, देशाने 2047 चे ध्येय ठेवले आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करायच्या असतील तर देशातील जेनझीचा त्यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. युवकांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, रोजगार आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.


दरम्यान, वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत असून राष्ट्रगीताबरोबर ते म्हणण्याचा निर्णय संसदेत झाला आहे. संसद ही संविधानामुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे संविधानाचा आदर आणि पालन न करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले. अशा दुर्दैवी घटनांचा पाठपुरावा करून त्यामागचे कारण शोधले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांवरील आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही केवळ कारवाई न करता त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाय करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

धर्मस्वातंत्र्य कायद्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, या माध्यमातून महिलांना अधिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. लग्न झालेली महिला असो किंवा मुलगी, तिला स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेता आला पाहिजे आणि हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर तिरंगाचा केक कापण्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तिरंगा घालणे किंवा परिधान करणे योग्य नसेल, तर तिरंग्याचा केक कापणे कसे योग्य ठरू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्याच्या यशाबाबत अमृता फडणवीस यांनी तिचे कौतुक केले. दिव्याने बुद्धिबळात केलेली प्रगती अभिमानास्पद असून राष्ट्रपतींच्या हस्ते तिला पदक मिळत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.



दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविण्याच्या चर्चेवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजी हे नागपूरचे आणि महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, त्यांना इथली सेवा करू द्या, त्यांना बाहेर का पाठवत आहे..? महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र ही देशातील अग्रणी राज्य असून जबाबदारी मोठी आहे. इथे जबाबदार व्यक्ती म्हणून देवेंद्रजी आहेत याचा मला आनंद आहे. त्यामुळे त्यांना येथेच काम करू द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या